दोन वेळा चुक झाली आता तिसरी चूक करू नका-सुशीलकुमार शिंदे
मंगळवेढा(प्रतिनिधी) मी इथला लोकप्रतिनिधी असताना विदर्भ अनुशेष ची अट रद्द करून मंगळवेढा उपसा योजना मंजूर केले.दोन वेळा चुक झाली आता तिसरी चूक करू नका.यंदाची लोकसभा निवडणूक अधिक सजग राहून लढावी लागणार आहे, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा येथे आयोजित संकल्प सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे,कार्याध्यक्ष अॅड नंदकुमार पवार,धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे,विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील,चेतन नरोटे,प्रकाश पाटील,मनोज यलगुलवार,मुझमील काझी,पांडुरंग चौगुले,तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी,राजाभाऊ चेळेकर,विनोद भोसले,सुशील बंदपट्टे,अॅड रविकिरण कोळेकर,पांडुरंग जावळे आदीसह काॅग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना शिंदे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात आपण सत्तेवर असताना अनेक विकासकामे केली. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, देशात एकमेव एकाच जिल्ह्यासाठी उभारलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, एनटीपीसी, सोलापूर-पुणे आणि सोलापूर-हैदराबाद महामार्गासह पालखी मार्गाचे चौपदरीकरण, रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण ही विकासकामे आपण सत्तेत असताना आणली. परंतु यापैकी काही प्रकल्पाचे आयते उद्घाटन पंतप्रधान मोदी करत आहेत. ही स्थिती सोलापूरचीच नाही तर संपूर्ण देशाची आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी भाजप व मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. आमदार प्रणिती शिदे यांना भाजपमध्ये ओढण्यासाठी शेवटच्या क्षणांपर्यंत प्रयत्न झाले. परंतु, प्रणितींच्या रक्तातच गांधी-नेहरूंचा काँग्रेसी विचार ठासून भरला आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.