मंगळवेढा(प्रतिनिधी)जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या निंबोणी शाखेच्या वतीने 5 महिला बचत गटांना 10 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून शाखा अधिकारी शिवराम देशपांडे यांच्या हस्ते बचत गटाच्या खात्याद्वारे वितरित करण्यात आले.
महिला दिनाच्या निमित्ताने बँकेच्या वित्तीय आणि डिजिटल साक्षरता अभियानाच्या कार्यक्रमप्रसंगी ऑफिसर अक्षय मलगोंडे, कॅशियर संजय कोळेकर, सीआरपी रुक्मिणी येडवे,चिंगाबाई करडे, राणी चव्हाण,मीरा बनसोडे ,वनिता मुंजे बँक सखी बानू पठाण आदीसह 127 महिला उपस्थित होत्या. यावेळी बोलताना शाखा अधिकारी शिवराम देशपांडे म्हणाले की, महिलांसाठी बँकेच्या वतीने अनेक कर्ज योजना असून त्या योजनेच्या माध्यमातून महिलांनी आपल्या पायावर उभे राहावे व बँकेच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाचा विनीयोग योग्य कामासाठी करून घेतलेले कर्ज वेळेत परतफेड केली तर बँकेत आपली पत निर्माण होते व भविष्यात तुम्हाला आणखीन जास्तीचा कर्ज पुरवठा करणे शक्य होईल त्या दृष्टीने महिलांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. यावेळी अक्षय मलगोंडे व संजय कोळेकर यांनी बँकेत खाते का आवश्यक आहे, बँकेच्या विमा योजना व वसुली संदर्भात मार्गदर्शन केले.