मंगळवेढा(प्रतिनिधी) गावागाड्याचा कारभार पाहणाऱ्या राज्यातील ७७५० ग्राम पंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून यामध्ये सोलापूर जिल्ह्यांतील १८९ सह मंगळवेढा तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबरला मतदान तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापणार आहे. सध्या गावागावांतून निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू आहे. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून २० डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. याबाबतची माहिती निवडणूक आयोगाने दुपारी प्रसिध्दीस दिली उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, सांगोला, अक्कलकोट, माळशिरस, मंगळवेढा, करमाळा, माढा, बार्शी, पंढरपूर, सांगोला, मोहोळ आदी तालुक्यातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ नोव्हेंबर २०२२ रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबर २०२२ रोजी होईल.नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी २० डिसेंबर २०२२ रोजी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. मंगळवेढा तालुक्यातील या ग्रामपंचायतीचे होणार निवडणूक!
डोंगरगाव, सोड्डी, बावची, पौट, पाठकळ, मारोळी, हाजापुर, शिरनांदगी, येड्राव, गोणेवाडी, खोमनाळ, फटेवाडी, रहाटेवाडी, तळसंगी, भालेवाडी, मारापुर गुंजेगांव व ढवळस.