सोलापूर(प्रतिनिधी)पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधी नाशिकचा दौरा केला. नाशिकमधील काळाराम मंदिरातील भजन, किर्तन आणि स्वच्छता मोहिम राबवली. नाशिक दौऱ्यातून नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील लोकसभेची तयारी सुरु केल्याची चर्चा सुरु झाली आहे.
आज पंतप्रधान सोलापूरमध्ये येत आहेत. अतिशय धावता हा दौरा आहे, मात्र तेवढाचा महत्त्वाचा आहे.सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष असतं. एकाचवेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देणारा हा जिल्हा आहे. गेल्या दोन टर्मपासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव या मतदारसंघात भाजपचे डॉ. जयसिद्धेशर स्वामी 2019 च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंचा पराभव केला होता. जयसिद्धेश्वर स्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे पुढच्यावेळेस भाजपला नवा उमेदवार येथे द्यावा लागणार आहे. तर आता सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आमदार प्रणिती शिंदे येथून काँग्रेसकडून लोकसभा लढवणार असल्याचे निश्चित मानले जाते. सोलापूर मतदारसंघातील लिंगायत, मागसवर्गीय आणि मराठा या तीन समाजाच्या मतदारांवरच जय-पराजयाचे गणित ठरते. काँग्रेसचा गड राहिलेला हा मतदारसंघ प्रणिती शिंदेंना उमेदवारी मिळाल्यास पुन्हा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच की काय कालपासून सुशीलकुमार शिंदे यांना भाजपची ऑफर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र त्यावर स्वतः शिंदेंनीच पडदा टाकला आहे. आमच्या रक्तात काँग्रेस असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सुशीलकुमार शिंदे हे राज्याचे पहिली दलित मुख्यमंत्री ठरले होते. त्यानंतर काँग्रेसने त्यांना उपराष्ट्रपती पदाचे उमेदवारीही दिली होती. माजी गृहमंत्री आणि राज्यपाल राहिलेले सुशीलकुमार शिंदेंनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. मात्र ते काँग्रेस आणि सोलापूरच्या सामाजिक कार्यक्रमात आजही सक्रिय आहेत. बुधवारी त्यांनी सोलापूरमधील नागरिकांसोबत ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात संवादही साधला. 2024 च्या लोकसभेसाठी भाजपची ‘चारसो पार’ची घोषणा आहे. त्यासाठी उत्तर भारतासोबतच महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगालमधील लोकसभा मतदारसंघ कायम राखणे त्यांना आवश्यक आहे. त्यासाठी एक-एका मतदारसंघासाठी भाजपची ही पराकाष्टा सुरु आहे. महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगालमधून दहा-दहा जागांचाही फटका भाजपला बसला, तरी 272 चा आकडा गाठणंही कठीण होऊन जाणार आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदी ‘चारसो पार’ला महाराष्ट्रातून खिंडार पडणार नाही यासाठी स्वतः काठावरच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्रात वारंवार दौरा करत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा या महाराष्ट्रात आहेत. मात्र येथे भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्याच्या नाराजीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता काही सर्वेंमधून व्यक्त झाली आहे. या सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन भाजपने राज्यात सर्वाधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी आता मोदींचे दौरे वाढवले आहेत का, असा सवाल राजकीय वर्तूळात उपस्थित होत आहे.