रंगभूमीवरचा ‘बॅरिस्टर’ हरपला; विक्रम गोखलें यांचे पुण्यात निधन!
पुणे(विशेष प्रतिनिधी) मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि हिंदी सिनेविश्वात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय कौशल्याने स्वत:ची स्वतंत्र ओळख प्रस्थापित करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे रविवारी पुण्यात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या १७ दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते.
यादरम्यान त्यांच्या प्रकृतीत अनेक चढउतार पाहायला मिळाले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, आज दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी विक्रम गोखले यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने रंगभूमी, चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सर्वस्तरांतून विक्रम गोखले यांना आदरांजली अर्पण केली जात आहे. विक्रम गोखले यांचे मराठी चित्रपट
‘मॅरेथॉन जिंदगी’, ‘आघात’, ‘आधारस्तंभ’, ‘आम्ही बोलतो मराठी’, ‘कळत नकळत’ ‘ज्योतिबाचा नवस’, ‘दरोडेखोर’, ‘दुसरी गोष्ट’, ‘दे दणादण’, ‘नटसम्राट’, ‘भिंगरी’, ‘महानंदा’, ‘माहेरची साडी’, ‘लपंडाव’, ‘वजीर’, ‘वऱहाडी आणि वाजंत्री’, ‘वासुदेव बळवंत फडके’, ‘सिद्धान्त’ हे गोखले यांचे गाजलेले मराठी चित्रपट आहेत.