पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवार गटात प्रवेश निश्चित!
विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे पक्षप्रवेश सोहळा!

अकलुज(प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने महाविकास आघाडीकडून मिळालेल्या दहा जागांपैकी नऊ जागांवर आपले उमेदवार घोषीत केले आहेत. मात्र पवारांनी अद्यापही माढा लोकसभेत आपला उमेदवार घोषीत केला नाही. अशातच माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. याठिकाणी भाजपने पुन्हा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील नाराज असल्याची माहिती आहे. यातच आता मोहिते पाटील शरद पवार गटाकडून निवडणूक लढणार असल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब होणार असल्याने भाजपसाठी पश्चिम महाराष्ट्रात हा मोठा धक्का मानला जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अकलुजच्या मोहिते पाटील कुटुंबाबाबत राजकीय वर्तुळात जी चर्चा सुरू होती. त्या चर्चेवर शिक्कामोर्तब होणार हे आता अखेर निश्चित झालं आहे.मोहिते पाटील कुटुंबीयांच्या निकटवर्तींनी आज सकाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाविषयी या भेटीत चर्चा करण्यात आली.
अकलुजमधील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे १३ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होईल.या पक्षप्रवेश सोहळ्याला विजयसिंह मोहिते पाटील आणि जयसिंह मोहिते पाटीलही उपस्थित राहतील, अशी माहिती शरद पवारांच्या भेटीनंतर मोहिते पाटलांच्या निकटवर्तीयांनी दिलीय. मोहिते पाटीट कुटुंबीय घरवापसी करणार असल्याने भापजपसाठी पश्चिम महाराष्ट्रात हा मोठा धक्का मानला जात आहे.