श्री रिद्धी सिद्धी गणेश मंदिराची मंगळवेढ्यात १४ फेब्रुवारीला प्राणप्रतिष्ठापना सोहळा!
मंगळवेढा(प्रतिनिधी)मंगळवेढा संतनगरीत गेल्या ४० वर्षांपासून निर्माणाधीन असलेल्या नवमंदिरात श्री रिद्धी सिद्धी महागणपती मूर्ती, इतर देवी-देवतांसह ५१ साधू-संतांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा तसेच कलशारोहण व ध्वजस्तंभारोहण सोहळा बुधवारी (दि. १४) रोजी होत आहे. मुंबईच्या श्री विठ्ठल रुक्मिणी वेद पाठशाळचे आचार्य वेदमूर्ती प्रसाद जोशी व आचार्य वेदमूर्ती हृषिकेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विधिवत होत आहे. या सोहळ्यानिमित्त सोमवार (दि. १२) पासून धार्मिक विधीला सुरुवात होत आहे, अशी माहिती मंदिराचे निमति अशोक कोळी व लता कोळी यांनी दिली. त्यानिमित्ताने दि. १२ ते १४ फेब्रुवारीदरम्यान तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. शहराच्या लौकिकात भर घालणाऱ्या तीन दिवसाच्या या महासोहळ्यास सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन श्री रिद्धी सिद्धी महागणपती प्राणप्रतिष्ठा सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले.
सोमवारी (दि. १२) सकाळी ७ ते ९ आरंभ, श्री गणेश पूजन, सकाळी ९ ते १२: श्रींच्या प्रतिकात्मक व देव देवतांच्या, साधू संतांच्या प्रतिमांची शहरातून मिरवणूक, दुपारी १२ ते ३ : भजन- शहर व तालुक्यातील सर्व महिला भजनी मंडळ सहभाग, दुपारी १२ ते सायंकाळी ६: मंडप पूजन, देवता स्थापना सायंपूजा व आरती. सायंकाळी ७.०० ते ९.३०: गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांचा भक्ती संगीत रजनी.
मंगळवारी सकाळी ७ ते ९ स्थापित देवता पूजन, दुपारी १२ ते ३ भजन – भजनी मंडळाचे सादरीकरण. दुपारी ३ ते ६ प्रधान होम संत मूर्ती स्थापना, सायंपूजा व आरती, सायंकाळी ७ ते ९.३० : कीर्तनकार श्री चैतन्य महाराज राऊत यांचे कीर्तन होईल.
बुधवारी सकाळी ११.५० ते १२.२० श्री रिध्दी सिधि महागणपती व सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. दुपारी १२:२० ते १ कलशारोहन व ध्वजारोहण दुपारी १२.३० ते २ या वेळेत महाआरती व महाप्रसाद, सायंकाळी ६.३० ते ७ दादासाहेब वेदक, महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या हस्ते विशेष सत्कार, सायंकाळी ७ ते ९: महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचे कीर्तनाने सांगता होईल