मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात विवाहाची धामधूम सुरू असतानाच प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कर्जाळ व धर्मगाव या दोन गावात बालविवाह रोखले. धर्मगाव या दोन ठिकाणी बालविवाह सुरू असल्याची माहिती चाइल्ड हेल्पलाइन १०९८ च्या माध्यमातून पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी तात्काळ पोलीसाची दोन पदके तयार करून या दोन गावी रवाना केली. पोलीस पथकातील कर्जाळ व डिकसळ या दोन गावातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांना सोबत घेऊन सदर ठिकाणी पाहणी केली असता, बालविवाह करण्याची तयारीत असल्याचे दिसून आले.
यावेळी अधिक चौकशी केली असता, यामधील मुलीचे वय 18 वर्षापेक्षा कमी असल्याने लग्न करता येणार नाही असे समजावून सांगितले. परंतु भविष्यात मुलीचे गुपचूप लग्न करतील यासाठी सदर बालविवाह होण्याची शक्यता ओळखून सदर नातेवाईकाचे समुपदेशन करून पुढील कारवाईसाठी अध्यक्ष बालकल्याण समिती यांच्याकडे पाठवून दिले.
उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने, पोलीस हेडकॉन्स्टेबल तुकाराम कोळी, पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीमंत पवार, महिला पोलीस वंदना अहिरे व सुनिता चवरे, पोलीस कॉन्स्टेबल कैलास खटकाळे, विठ्ठल विभूते आधी या कारवाईत सहभागी झाले.