अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आ.समाधान आवताडे यांना तालिका अध्यक्षपदाची जबाबदारी!
नाना नंतर दादांना मतदारसंघातून या पदाची संधी!
पंढरपूर-मंगळवेढ्याचे भाजपाचे आमदार समाधान आवताडे यांना पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी समाधान आवताडे यांची वर्णी लागली आहे. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे.विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षांची तालिका अध्यक्ष म्हणून पाच जणांची निवड केल्याची घोषणा करण्यात आले. यामध्ये भाजपकडून दोघांना संधी देण्यात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या एका आमदाराची वर्णी लावण्यात आली आहे. तालिका अध्यक्ष म्हणून भाजपकडून आमदार कालिदास कोळंबकर, समाधान आवताडे, शिवसेना शिंदे गटाकडून संजय शिरसाट, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून किरण लहामटे आणि काँग्रेसकडून अमिन पटेल या पाच आमदारांची निवड तालिका अध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे.
समाधान आवताडे हे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पराभव केला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना मताधिक्य मिळाले होते, त्यामुळे समाधान आवताडे आणि त्यांचा मतदारसंघ चर्चेत होता.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपकडून त्यांना बढती मिळाली असून विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदावर संधी देण्यात आली आहे. समाधान आवताडे यांच्या अगोदर या मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांनी तालिका अध्यक्ष म्हणून काम केले आहे, त्यामुळे प्रथमच आमदार झालेल्या आवताडे यांच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे.