पंढरपूरमंगळवेढासामाजिकसोलापूर

अरे कुठे नेऊन ठेवला आहात वडार कॉलनी आमची! जय भवानी वडार सोसायटी नगरपालिका किंवा ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट करून न्याय द्या!…अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालया समोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा….

मंगळवेढा (प्रतिनिधी) वडार समाज लोकवस्ती असलेल्या जय भवानी सोसायटी कोणत्याही नगरपालिका, ग्रामपंचायत व महापालिका हद्दीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत येत नसल्यामुळे त्या लोकवस्तीत नवजात बालाकाचा जन्म झाला किंवा कोणाचा मूत्यू झाला तर नोंद सुध्दा होत नाहि. ह्या लोकवस्तीत सेवा सुविधा,शासकीय योजना मिळणे लांबच राहते त्यामुळे ह्या लोकवस्तीना वेगळ्या देशाची मान्यता द्यावी…अन्यथा सामूहिक आत्मदहनाचा इशारा देण्यात येत आहे. दिंनाक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी यांच्या कार्यालया समोर करण्यात येणार आहे. असे मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष आदित्य हिंदुस्थानी,तालुकाध्यक्ष चंद्रकांत पवार,शहराध्यक्ष गणेश धोत्रे, युवा तालुकाध्यक्ष सागर जाधव,युवा शहराध्यक्ष किरण घोडके यांनी दिला आहे.
देश महासत्ता बनण्याच्या वाटेवर असताना वर्षानुवर्षापासुन दारिद्रयाच्या खाईत पिचत पडलेला वडारसमाज सर्वांगीण विकासापासुन दूर असल्याचे विदारक चित्र आजही सर्वत्र पहावयास मिळते. ‘खाई छन्नी हातोड्याचा घाव, त्यास माणुस हे नाव’ साधी माणसं या चित्रपटातील गीताच्या ओळीप्रमाणे वडारसमाज आजही अन्याय, अत्याचाराचे घाव सहन करीत लाखो वडारसमाज बांधव उदरनिर्वाह करीत आहेत. परंतू या उपेक्षित समाजाकडे लक्ष द्यायला ना शासनास वेळ आहे, ना कोणताही पुढारी पुढे येत नाही. एकसंघ समाज संघटन, अंधश्रद्धा, अशिक्षितपणामुळे हा समाज विकासापासुन वंचित राहीला आहे. या समाजाच्या उन्नतीकरिता शासनाने प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

हिंदु धर्म प्रथेप्रमाणे दगडालाही देव मानले जाते, दगडाच्या मुर्ती पुढे श्रद्धाळू लाखो भक्त नतमस्तक होतात, परंतू दगडाला देव बनविणार्‍या वडार समाजाची आजही अवहेलना होत असुन स्वातंत्र्यातही त्यांना वेठाबिगारीचे जीवन जगावे लागत आहे. संपूर्ण देशभरात वडार समाज विखुरला गेला असुन या समाजाचा उगम मुख्य केरळ राज्यातुन झाल्याचे सांगितले जाते. पुरातन काळात वडराज नावाचा राजाही केरळात होवुन गेला. त्याने दगडी शिल्प कलेस प्रोत्साहन दिले, हेमाडपंथी मंदीरे हे वडार समाजाच्या स्थापत्य शैलीचा व कलेचा अजोड नमुना आहे. या शैलीत अनेक मंदीरे दक्षिण भारतात निर्माण झाली. तसेच मोठमोठे चिरेबंदी किल्ले, राजवाडे ही या समाजबांधवांनी बांधली परंतु त्याच्या कलेप्रमाणे कलाकारास प्रसिद्धी मिळाली नाही. वडार समाजाचे अनेक पोट घटक जात आहेत. माती काढुन गाढवावर ओढणार्‍या वडारास माती वडार, जमिनीतुन दगड काढुन गाडीवर वाहणार्‍यास गाडीवडार, दगड घडविणारा पाथरवट याप्रमाणे जाती आहेत. या समाजास कोणताही कुलदैवत अथवा कोणताही गुरू नाही. परंतू या समाजात अंधश्रद्धेचे पेव मोठे आहे. स्व:ताच घडविलेल्या दगडाला देव मानुन नवस करणे, श्रद्धा ठेवणे, अंधश्रद्धेपोटी कोंबडी, बकरे कापणे, यासह मद्यपान मोठ्याप्रमाणावर चालते. महाराष्ट्र राज्यात ३० ते ३५ लाख वडार समाजाची लोकसंख्या असुन त्यापैकी केवळ बोटावर मोजण्या इतपत शिक्षित लोक आहेत. तर व्यापार, उद्योग व राजकारणात हा समाज आढळत नाही. खाणीतुन दगड काढणे, चिरे, कोणे, उंबरठा, छावणी, मोठा चिरा, खलबत्ता वरंवटा, जाते, गलथा, उखळ इत्यादीसह पाषण मुर्ती तयार करून त्याच्या विक्रीतुन येणार्‍या पैशातुन स्वता:चा उदरनिर्वाह करीत असतो. या समाजात कष्ट करणे यावर अधिक भर असुन शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले जात नाही. त्यामुळे या समजाचा विकास २१ व्या शतकातही खुंटला आहे. शासन विविध योजना राबविते, परंतू त्याची याना काहीही माहिती मिळत नाही. अनेक वडार नागरीक उदरनिर्वाहासाठी भटकंती करतात. त्यामुळे त्यांचे राहण्याचे ठिकाण हे निश्‍चित नाही. दारिद्रय रेषेखालील अनेक धनदांडगे सोयीसुविधा उपलब्ध करून घेत असताना, या समाजातील जवळपास ५ ते १० टक्केच लोकांना लाभ होतो. तरी या समाजाच्या प्रगतीसाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. अशा या उपेक्षित वडार समाजाला शासनदरबारी न्याय मिळेल, या अपेक्षेने अजुनही ‘छन्नी हाथोड्याला’ घाव झेलुन जीवन जगत आहेत.

प्रमुख मागण्या:

१. जय भवानी हाउसिंग सोसायटीमध्ये सर्व वडार समाजातील व गोरगरीब,शेतमजूर, असंघटित कामगार वास्तव्यात आहेत. त्या जय भवानी हाऊसिंग सोसायटी ही नगरपालिका व ग्रामपंचायत हद्दीमध्ये नसल्यामुळे त्या ठिकाणी आजही चालण्यासाठी रस्ते नाहीत, सांडपाण्यासाठी गटारे नाहीत, घनकचरा व्यवस्थापन, शौचालय, रस्त्यावरील दिवे अशी नागरिक सेवा सुविधा मिळत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबाची दयनीय अवस्था झालेली आहे. त्यामुळे जय भवानी हाऊसिंग सोसायटी नगरपालिका हद्दीत व ग्रामपंचायत हद्दीत नसल्यामुळे त्या ठिकाणी विकास कामे होत नाहीत. तरी त्वरित नगरपालिका अंतर्गत विकास निधी देऊन जय भवानी हाऊसिंग सोसायटीमध्ये रस्ते, गटारी, रस्त्यावरील दिवे समाज मंदिरासाठी निधी देण्यात यावा.

२. जय भवानी हाउसिंग सोसायटीमध्ये सर्व कुटुंब दारिद्र्यरेषेखालील असून त्यांचे आर्थिक परिस्थिती बेताची आहे. तरी या सोसायटीमध्ये महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्सचे कर्ज आहे. त्यातील ६०% रक्कम ही महामार्गामध्ये सोसायटीची जमीन गेल्यामुळे शासनाकडून आलेली रक्कम महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स ने भरून घेतलेले आहेत. तरी कर्ज हे सोसायटीमधील कुटुंब भरू शकत नाही. त्यामुळे उर्वरित कर्ज माफ करावे.

३.सिटी सर्वे क्रमांक ३७५५ वडार गल्ली मंगळवेढा येथे जुने समाज मंदिरातून ते जीर्ण झाल्यामुळे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सदर समाज मंदिर पावसाळ्यामध्ये गळते तरी त्या ठिकाणी वडार भवनासाठी निधी मिळावा.

४. वडार समाजातील लोक हे उदरनिर्वाहासाठी इतरत्र गावोगावी भटकंती करत असल्यामुळे सन १९६१ सालचा जातीच्या दाखल्यासाठी जाचक पुराव्याची अट शिथिल करावी.

५. मंगळवेढ्यातील वडार समाज वास्तव्यास असलेल्या ठिकाणी मंगळवेढा शहर, डोणज, नंदुर, लक्ष्मी दहिवडी येथे महसूल विभागाचे दाखले जातीचा दाखला, रेशन कार्ड व इतर दाखले शिबिर घेण्यात यावे.

६. वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाबाबत वडार समाजाला देण्यात येणाऱ्या कर्ज योजनांमध्ये विना तारण कर्ज देण्यात यावे व जामीनदाराची अट शिथिल करण्यात यावी. तसेच महामंडळाचे कर्ज मंजूर झाल्यास बँका मात्र कर्ज देण्यास टाळाटाळ करतात बँकांना कार्यवाहीसाठी निर्देश देण्यात यावे.

७.वडार समाजाच्या वस्त्या आहेत त्या सर्व वस्त्यांच्या जमिनीची मालकी वडार समाजाला देण्यात यावी व त्याच ठिकाणी पक्की घरे बांधण्यासाठी प्रत्येकी साडेचार लाखापर्यंत अनुदान देण्यात यावे अशी योजना आहे. मंगळवेढ्यातील जय भवानी हाऊसिंग सोसायटी येथे सर्व वडार समाजातील कुटुंबानं घरकुल मंजूर करावे.

८. गौण खनिज उत्खनन करून दगडफोडीचा पिढीचा व्यवसाय करणाऱ्या वडार समाजातील परवाना वाटप शिबिर मंगळवेढा येथे घेण्यात यावा व गौण खनिज उत्खनन ५०० ब्रास ची सवलत देण्यात यावी. महाराष्ट्र शासन निर्णय महसूल व वन मंत्रालयाच्या सन २०१५ ला शासन निर्णय २०० ब्रासचा करण्यात आला होता.

९. कृष्ण तलाव झोपडपट्टी येथे सर्व नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल देण्यात यावे व रस्ता पिण्याच्या पाण्याची सोय गटारे शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी.

१०. बांधकाम कामगारांसाठी आर्थिक, शैक्षणिक वैद्यकीय व सामाजिक उन्नती व्हावी. यासाठी सर्व योजना आहेत. मात्र या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. बांधकाम कामगार नोंदणी ही प्रत्येक गावागावात जाऊन नोंदणी करण्याचा उद्देश बांधकाम कामगार कल्याण मंडळाचा आहे. मात्र प्रत्यक्षात बांधकाम कामगार नोंदणी होत नाही. त्यामुळे बांधकाम कामगार म्हणून शिबिर शनिवार पेठ मंगळवेढा, डोणज, लक्ष्मी दहिवडी, नंदुर येथे त्वरित आयोजित करण्यात यावा.

११. मंगळवेढा नगरपालिकेचे शेळके शौचालयाचे सांडपाणी उघड्यावर सोडल्यामुळे त्या ठिकाणी पाणी जाण्यासाठि कोणतीही गटार नसल्यामुळे त्या ठिकाणी पाणी साठून राहिल्या मुळे दुर्घंधी पसरली आहे. सांगोला नाका ते कृष्ण तलाव सांडपाणी गटार त्वरित करण्यात यावी.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close