पंढरपूरमंगळवेढासामाजिकसोलापूर

उषा मंगेशकर यांच्या गायनाने मंगळवेढेकर झाले मंत्रमुग्ध!

सुरसंगम ग्रुपचे निर्माता दिगंबर भगरे,लहू ढगे यांनीही उषा मंगेशकर,कविता पौडवाल यांचेसोबत गायन करून कार्यक्रमात रंगत आणली!

 

मंगळवेढा(प्रतिनिधी) धनश्री महिला पतसंस्थेचा रौप्य महोत्सव धनश्री मल्टीस्टेटची तपपुर्ती तसेच धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा.शिवाजीराव काळुंगे व धनश्रीच्या चेअरमन प्रा.शोभा काळुंगे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नुकताच मंगळवेढयात धनश्री व सिताराम परिवाराच्या वतीने सुरसंगम ग्रुप प्रस्तूत उषा मंगेशकर संगीत रजनी या कार्यक्रमात प्रख्यात गायिका उषा मंगेशकर यांनी स्वतः गायलेली व गायकोकिळा पद्मश्री लता मंगेशकर यांनी गायलेली विविध हिंदी मराठी गीते सादर करून मंगळवेढा व पंचक्रोशीतील नागरिकांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमाचे उदघाटन सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या हस्ते व विठ्ठल शुगर्सचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भैरवनाथ शुगर युनिट 3 चे चेअरमन अनिल सावंत,रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा,उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड,पोलिस निरिक्षक रणजित माने आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

सुरुवातीस प्रा.शिवाजीराव काळुंगे,प्रा.शोभा काळुंगे,डॉ.राजलक्ष्मी गायकवाड,अ‍ॅड.दिपाली पाटील,स्नेहल मुदगल,सीमा काळुंगे,सुयोग गायकवाड आदींच्या हस्ते पार्श्वगायिका उषा मंगेशकर,कविता पौडवाल,महंमद अयाज,अनुष्का शिकतोडे,भाग्यश्री चव्हाण यांचा स्मृतीचिन्ह व मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमात उषा मंगेशकर यांनी राजाच्या रंग महाली,मुंगडा मुंगडा,माळयाच्या मळयामधी कोण गं उभी,ऐ मेरे वतन के लोगो अशी सदाबहार गीते सादर करत वयाच्या 88 व्या वर्षीदेखील श्रोत्यांतून मिळालेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सर्वाचे लक्ष वेधले.

कविता पौडवाल यांनी रुपेरी वाळूत,चोरीचा मामला,नजर के सामने,अश्विनी ये ना अशी एकापेक्षा एक सरस गीते सादर केली.

तर महंमद अयाज यांनी खेळ मांडला,दर्दे दिल दर्दे जिगर,मै बेनाम हो गया,मुसाफिर जानेवाले अशी विविध गीते सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.

सुर नवा ध्यास नवा फेम गायिका अनुष्का शिकतोडे यांनी अजिब दासता है ए,हर किसीको नही मिलता,होे लाल मेरी,चंद्रा या गीतांबरोबरच सुफी व वेस्टर्न गीते सादर करून टाळया मिळविल्या.तर विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी महंमद अयाज यांचेसोबत बने चाहे दुश्मन हे गाणे सादर करून सर्वांचे लक्ष वेधले.

या कार्यक्रमात भाग्यश्री चव्हाण,सुरसंगम ग्रुपचे निर्माता दिगंबर भगरे,लहू ढगे  यांनीही उषा मंगेशकर,कविता पौडवाल,मोहंमद अयाज,भाग्यश्री चव्हाण यांचेसोबत गायन करून कार्यक्रमात रंगत आणली.

मंगळवेढ्यात प्रथमच सादर करण्यात आलेल्या या भव्य अशा संगीत रजनी कार्यक्रमाचे हजारो लोक साक्षीदार बनले.यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

 संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन व आभार प्रदर्शन रफिक शेख यांनी केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close