मंगळवेढासोलापूर

आकाशात आलेल्या काळयाकुट्ट ढगामुळे शेतकर्‍यांचा जीव लागला टांगणीला!

मंगळवेढा(प्रतिनिधी)मंगळवेढा शहर व परिसरात रविवारी आकाशात काळेकुट्ट ढग आल्याने पावसाळी वातावरण तयार झाले होते. दरम्यान, परतीच्या पावसाने पिकांचे झालेले नुकसान अदयापही भरून निघाले नसल्याने पुन्हा आकाशात आलेले ढग पाहून शेतकर्‍यांच्या काळजाचे ठोके वाढले.सायंकाळी मंगळवेढा शहर व परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याचे चित्र होते.
सध्या हिवाळी हंगामात थंडी सुटणे अपेक्षित असताना निसर्गाने आपल्या नियमात बदल केल्याने रविवारी दिवसभर सुर्यदर्शन न होता आकाशात काळेकुट्ट ढग आल्याचे चित्र होते.बंगालच्या उपसागरात तयार झालेले मंदौस चक्री वादळामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याकडून संागण्यात आले.आक्टोबर महिन्याच्या शेवटी परतीच्या पावसाने मोठया प्रमाणात सतत हजेरी लावल्याने काळया शिवारात सर्वत्र तळे साचल्याप्रमाणे पाणी साचून राहिले होते. अदयापही काही ठिकाणी ऊसाच्या क्षेत्रामधील पाण्याची ओल हटली नसल्यामुळे याचा परिणाम ऊसतोडीवर झाला आहे.या भागातील जुन व जुलै महिन्यात लागण केलेल्या अडसाली ऊसाची तोडणी अदयापही ओलीमुळे सुरु होवू शकली नाही.सध्या निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे पुन्हा शेतकर्‍यांच्या काळजाचे ठोके वाढले आहेत.पाऊस पडल्यानंतर ऊस कसा जाणार या विवंचनेने ते रविवारी दिवसभर ग्रासून गेले होते. रविवारी सायंकाळी मंगळवेढा शहर परिसरात पावसाच्या हालक्या सरी कोसळल्या,सुर्यदर्शन न झाल्यामुळे हवेतील तपमान खाली येवून हवेत गारवा निर्माण झाला आहे.हवामान खात्याने 15 डिसेंबरपर्यंत राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकर्‍यांचा जीव टांगणीला लागला आहे.अदयापही काळया शिवारात गहू व हरभरा यांची पेरणी सुरु आहे.पाऊस पडल्यानंतर ही पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तविली जात आहे.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close