राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ५ ते ८ डिसेंबरदरम्यान होण्याची शक्यता? सोलापूर जिल्हातुन रणजीतसिंह मोहिते-पाटील व आ.विजयकुमार देशमुख यांचे नावे आघाडीवर!
मुंबई(विशेष प्रतिनिधी) गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. ५ ते ८ डिसेंबरदरम्यान हा विस्तार होईल, असे सांगितले जाते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या गुवाहाटी दौऱ्यावर आहेत.या दौऱ्यातच त्यांच्या गटातील संभाव्य मंत्री आणि राज्यमंत्र्यांची नावे ठरतील, असेही सांगितले जाते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही श्रेष्ठींशी बोलून येत्या आठवड्यात भाजपची नावे नक्की करतील. शिंदे आणि फडणवीस त्यानंतर एकत्र चर्चा करून येत्या आठवडाअखेर मंत्रिमंडळ आणि समकक्ष दर्जाच्या अन्य पदांसाठी नावावर शिक्कामोर्तब करतील, असे समजते.
दिल्लीत भाजपच्या वरिष्ठांची भेट घेऊन मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस विस्ताराची निश्चित तारीख जाहीर करण्याची शक्यता असून, सत्तेत आल्यानंतरचा हा तिसरा विस्तार शपथविधी असेल. या विस्तारात सहा ते आठ कॅबिनेट, तर दहा ते बारा राज्यमंत्री यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्यात शिंदे गटाचे दोन कॅबिनेट आणि चार राज्यमंत्री, तर अपक्ष गटाचे दोन कॅबिनेट आणि १ राज्यमंत्री, तर भाजपचे एकूण १२ जण मंत्री आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी ९ ऑगस्टला पहिला विस्तार करून त्यात
बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या प्रत्येकी ९ कॅबिनेट मंत्र्यांना शपथ देण्यात आली होती. शिवसेनेत बंड करताना शब्द देऊनही काही आमदारांना मंत्रीपद न मिळाल्याने शिंदे गटातील आमदारांची नाराजी उघड झाली आहे. शिंदे समर्थक आमदारांच्या नाराजीप्रमाणेच भारतीय जनतापक्षातही २०१४ नंतर आलेल्या अनेक मोठ्या नेत्यांची नाराजी असल्याने निष्ठावंतांना बाजूला ठेवून त्यांना संधी देण्यावर भर दिला जाण्याची चर्चा आहे. दिवाळी मीलन कार्यक्रमात फडणवीस मंत्रिमंडळाच्या विस्तारावर स्पष्टपणे बोलताना भाजपच्या जुन्या आमदार, नेत्यांनी फार अपेक्षा न ठेवता पक्षासाठी अजून काही काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात ४० मंत्र्यांची संख्या पूर्ण केली जाणार असून तीन जागा रिक्त ठेवल्या जाण्याची शक्यता आहे. दरम्यान सोलापूर जिल्हातून भाजपाच्या कोट्यातून विधानपरिषदेचे सदस्य रणजीतसिंह मोहिते पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे .सोलापूर जिल्ह्यातील पक्ष वाढी बरोबर सहकार क्षेत्रातील व प्रशासकीय कामकाजातील अनुभव हे पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असल्यामुळे यांचे नाव आघाडीवर आहे तसेच सोलापूर शहरातून शांत व संयमी असे नेतृत्व माजी पालकमंत्री आ.विजयकुमार देशमुख यांचेही नाव जवळपास निश्चित मानले जाते.कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्था ,विधानसभा ,लोकसभा लक्षात घेता त्यांना मंत्रीपद देणे अत्यंत गरजे असल्यामुळे भाजपाच्या वरिष्ठ गोठातून बोलले जात आहे.