Uncategorizedमंगळवेढासोलापूर

सततच्या पडलेल्या पावसामुळे नुकसानग्रस्त सर्व पिकांचे पंचनामे करण्याचे महसुलचे नव्याने आदेश!

नवीन सुधारीत आदेशामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त!

 

मंगळवेढा (प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्यात परतीचा पडणार्‍या सततच्या पावसामुळे कांदा, सुर्यफुल, ज्वारी, तूर, सोयाबीन, मका, बाजरी, ऊस व इतर पिकांचे नुकसान झाल्याने त्यांचे पंचनामे करण्याचे सुधारीत आदेश सर्व तलाठयांना दिल्याची माहिती महसुल नायब तहसिलदार सुधाकर धाईंजे यांनी दिली आहे.

ऑक्टोबर महिन्यात हस्त नक्षत्रामध्ये परतीचा पाऊस सतत पडल्याने काळया शिवारात मोठया प्रमाणात पाणी साचून कांदा, सुर्यफुल, ज्वारी, तूर, सोयाबीन, मका, बाजरी, ऊस व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला असल्याने त्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे. सुर्यफुल, मका जागेवर जळून गेले तर कांदा शेतामध्ये नासून गेला आहे. ऊसासारख्या पिकात गेली तीन महिने पाणी साचून राहिल्यामुळे पाण्यावर शेवाळयाचा थर आल्याने जमीन क्षारयुक्त बनत असल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. परिणामी साचून राहिलेल्या पाण्यामुळे ऊसाचे वजन घटले असून वाढही खुंटली असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. रब्बी पेरणी वेळी सतत पडलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी ही पिवळी पडली आहे. तसेच पेरलेले काही ठिकाणी न उगवल्यामुळे शेतकर्‍यानी दुबार पेरणी केल्याचे चित्र आहे. मागील आठवडयात महसुल विभागाने केवळ कांदा व सोयाबीन पिकाचे पंचनामे करण्याचे फर्मान काढले होते. सोयाबीन पिक काळया जमिनीत घेतले जात नसतानाही फर्मान काढल्यामुळे शेतकरी वर्गातून आश्‍चर्य व्यक्त होत होते. जळालेल्या सुर्यफुल पिकाचे पंचनामे करण्याची मागणी तलाठयाकडे केल्यानंतर आम्हाला अधिकार्‍यांनी पंचनामे करण्याचे केवळ तोंडी आदेश दिले असून सुर्यफुलाबाबत सांगितले नसल्याचे सांगून त्याचे पंचनामे करण्याचे टाळल्याचे शेतकर्‍यांच्या तक्रारी होत्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवेढयाच्या भेटीला आल्यावर पिकांच्या पंचनाम्याबाबत काहीतरी बोलतील अशी शेतकरी मेळाव्यात अपेक्षा होती मात्र त्यांनी याबाबत कुठलेच भाष्य न केल्यामुळे शेतकर्‍यांच्या अपेक्षेवर पाणी पडले होते. केवळ 65 मि.मि.पावसाची अट रद्द केल्याचे एवढेच सांगितले होते.
यावर शेतकर्‍यांनी तक्रारी केल्यानंतर वरील सर्व पिकांचा नुकसानीमध्ये समावेश करून सुधारीत पंचनामे करण्याचे आदेश काढल्याचे महसुल विभागाकडून सांगण्यात आले. पुर्वी पंचनामेवेळी 65 मि.मि.पावसाची अट लावण्यात आली होती मात्र ही अट रद्द करून सतत पडणार्‍या पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे सुधारीत आदेश दिले असल्याचे सांगण्यात आले.
नवीन सुधारीत आदेशामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. महसूलच्या वरिष्ठ अधिकार्‍याने नुकसानीप्रमाणे पंचनामे होतात की नाही याची खातरजमा करून मगच एकूण नुकसानीची आकडेवारी काढावी अशी शेतकरी वर्गांची मागणी आहे. जेणेकरून कुठलाही शेतकरी या नुकसानीपासून वंचित राहता कामा नये अशा भावना शेतकर्‍यांच्या आहेत.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close