मंगळवेढा(प्रतिनिधी)तालुक्यातील कचरेवाडी येथील रामेश्वर पडवळे व सिद्धेश्वर पडवळे
दोन सख्खे भाऊ मात्र गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांच्या घरी जाणे दूरच पण तोंडही पाहणे नाही दोन्ही घरात बेबनाव, ताणतणाव आणि भांडणे रोजचीच आणि या सर्वाचे निमित्त एका भावाने दुसऱ्या भावाचा अडवलेला रस्ता..! दोन भावात तुटलेला संवाद मंगळवेढ्यात नव्याने रूजू झालेले तहसीलदार मदन जाधव यांनी यामध्ये पुढाकार घेत महसूल सप्ताह अंतर्गत ‘जनसंवाद’ या उपक्रमामध्ये हा रस्त्याचा विषय आपापसात सामंजस्याने सोडवून बंद संवाद पुन्हा सुरू करण्यात यश मिळवले.
या घटनेची सविस्तर हकीकत अशी की, तालुक्यातील कचरेवाडी गावच्या हद्दीमध्ये जमीन असणाऱ्या रामेश्वर मारुती पडवळे व सिद्धेश्वर मारुती पडवळे हे दोन भाऊ असून यातील रामेश्वर मारुती पडवळे यांचे कचरेवाडी हद्दीतील गट क्रमांक 163/2/ब व सिद्धेश्वर मारुती पडवळे यांचे गट क्रमांक 163/2/क येथे प्रत्येकी 1 हेक्टर 32 गुंठे क्षेत्र आहे. तसेच पाच वर्षांपासून येथील रस्त्याबाबत दोन्ही भावांचा वाद सुरू होता. या वादाचे पर्यावसन कुटुंबात होऊन दोन्ही कुटुंबातील सदस्यांची मने दुभंगली होती. रस्त्यावरून होणाऱ्या वादाचा परिणाम वारंवार घरगुती भांडणात होत होता. या रस्त्याबाबत तहसील कार्यालयात अर्धन्यायिक प्रकरण सुरू होते. दोन्ही पक्षांनी आपली बाजू मांडण्यासाठी वकिलांची नेमणूक केली होती.
परंतु महसूल सप्ताह निमित्त केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत दोन्ही भावांनी घेतलेल्या निर्णय घेतला आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाला दोन्ही वकिलांनीही आनंदाने होकार दिला व दोन भावांमध्ये आपापसात समझोता होण्यासाठी प्रयत्न केले. तहसिल कार्यालयात दोन्ही भाऊ आणि दोन्ही बाजूचे वकील यांनी उपस्थित राहून आपापसात लेखी तडजोडनामा तयार करून सादर केला.यावेळी तहसीलदार मदन जाधव यांच्या हस्ते दोन्ही भाऊ व दोन्ही वकील यांना रोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाच वर्षापासून चाललेल्या रस्त्याचा वाद आपसात मिटवल्याने दोन्ही भावांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
दोन्ही भावांच्या चेहऱ्यावर केवळ रस्त्याचाच नाही तर कुटुंबातील सुद्धा वाद मिटून दोन्ही कुटुंबातील मने जुळल्याचा भाव स्पष्ट दिसत होता.
या प्रकरणामध्ये अॕड.मनीष मर्दा व अॕड अनिल दुधाळ यांनी मोलाची भूमिका बजावली.
——
तालुक्यातील इतरही ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याबाबत शेतकऱ्यांनी वादविवाद न करता आपापसात सामंजस्याने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा. प्रशासन त्यांना संपूर्ण सहकार्य करेल.हे आपसात मिटल्यास शेतकऱ्यांचा वेळेची व आर्थिक बचत होणार आहे. शिवाय गावातील वातावरणही सौहार्दपूर्ण रहायला मदत होणार आहे. इतरही शेतकऱ्यांनी महसूलच्या विविध उपक्रमात सहभागी होऊन आपली प्रकरणे निकाली काढून घ्यावीत.
मदन जाधव,तहसीलदार मंगळवेढा