पंढरपूरमंगळवेढाशैक्षणिकसोलापूर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा उद्या पासून!

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा उद्या सोमवारपासून (ता. २३) सुरू होत आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर बैठे पथक नेमण्यात आले आहेत. विद्यापीठाची चार भरारी पथके व एक अचानक भेट देणारे पथक असणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा सोमवारपासून (ता. २३) जिल्ह्यातील ४८ केंद्रांवर सुरू होत आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. या परीक्षेवर बैठे पथक, भरारी पथकाची नजर राहणार असल्याचे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक परीक्षा नियंत्रक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी सांगितले. विद्यापीठाकडून परीक्षा केंद्र चालकांना परीक्षेच्या दीड तास अगोदर ऑनलाइन पद्धतीने संबंधित विषयाची प्रश्नपत्रिका पाठविली जाणार आहे. त्यानंतर त्याचे झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वितरीत होईल. दरम्यान, परीक्षार्थींनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, अशी सूचना विद्यार्थ्यांना केली आहे. सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित १०९ महाविद्यालयांमधील जवळपास ७८ हजार विद्यार्थी परीक्षा देतील. बीए, बीकॉम, बीएस्सी, बीबीए, बीसीए या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे पहिले सत्र आणि बीएड, बीपीएड, एमएड, एमपीड, बीए-एलएलबी या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाचे तृतीय सत्र सोमवारपासून सुरू होणार आहे. एलएलबीच्या द्वितीय वर्षाचे तिसरे सत्र २४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. बीए, बीकॉम, बीएस्सी, बीबीए, बीसीए या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे पाचवे सत्र २७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. अभियांत्रिकीच्या (बी-टेक) तृतीय वर्षाचे सत्र पाचवे व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे सत्र सातवे २५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. बीई-आर्किटेक्चरच्या द्वितीय वर्षाचे तिसरे सत्र देखील त्याचवेळी सुरू होईल. बी-टेक अभ्यासक्रमाचे द्वितीय वर्षाचे तिसरे सत्र, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात बी-टेकच्या पहिल्या वर्षाचे प्रथम सत्र सुरू होईल. दरम्यान, कोरोनानंतर पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना वर्णनात्मक प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचा तणाव न घेता अभ्यासपूर्ण तयारी निशी परीक्षा द्यावी, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close