मंगळवेढा (प्रतिनिधी) मंगळवेढा पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिंमतराव जाधव यांनी दि.12 गुरुवार रोजी सकाळी 11 ते रात्री 9 या दरम्यान करण्यात आली. दरम्यान पोलीसांची परेड तसेच पोलीस ठाण्याकडील तपासाबाबत असणारे गुन्हे यांची तपासणी यावेळी करुन उत्कृष्ट कामगिरीबद्दल 8 पोलीस कर्मचार्यांना रिवॉर्ड देण्यात आले.
मंगळवेढा पोलीस ठाण्याला अतिरिक्त पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव व पोलीस अधिक्षक कार्यालयाकडील एक कर्मचारी टीम यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता मंगळवेढा पोलीस ठाण्याला प्रत्यक्ष भेट देवून वार्षिक तपासणी केली. दरम्यान यामध्ये पोलीस ठाण्याकडील असणारे गुन्हे,नागरिकांचे तक्रारी अर्ज, मुद्देमाल निर्गती, पोलीस कर्मचार्यांच्या अडीअडचणी, पोलीसांची परेड आदींची पाहणी करण्यात आली. या दरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणार्या पोलीसांना रिवॉर्ड देण्यात आला. पोलीस निरीक्षक रणजीत माने,सहायक फौजदार अविनाश पाटील, पोलीस शिपाई राजू आवटे, सुरज देशमुख, सुनिल शिंदे, पोलीस हवालदार योगेश नवले, प्रमोद मोरे व अन्य पोलीस कर्मचार्यांचा या रिवॉर्डमध्ये समावेश आहे. दुपारी पोलीस ठाण्यात अतिरिक्त पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव यांनी पोलीस कर्मचार्यांचा दरबार घेवून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. तसेच त्यांनी मंगळवेढा पोलीस स्टेशन परिसरातील स्वच्छता व वृक्षारोपण केलेल्या झाडांची निगा व्यवस्थितरित्या ठेवली जाते की नाही याचीही पाहणी केली.
पोलीस निरिक्षक रणजीत माने यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर मंगळवेढा पोलीस ठाणे इमारतीचा विस्तार केल्याने पोलीस ठाण्याला एक आगळवेगळ रुप प्राप्त झाले असून या इमारतीचीही पाहणी यावेळी करण्यात आली.