
मंगळवेढा(प्रतिनिधी) जिल्हा परिषद केंद्र शाळा नंदेश्वर येथे सहशालेय उपक्रम व दशसूत्री कार्यक्रम अंतर्गत मुलांचे व्यवहारज्ञान वाढविण्यासाठी आठवडी बाजार या उपक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 9 रोजी सकाळी 11.00 वाजता केले होते. पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बजरंग पांढरे, विस्तार अधिकारी पोपट लवटे, केंद्रप्रमुख धनाजी नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद केंद्र शाळा नंदेश्वर येथे आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलांनी आपल्या शेतात असलेला भाजीपाला, केळी, कणसे तसेच इतर साहित्य विक्रीस आणले होते. त्याचबरोबर यामध्ये गोळ्या बिस्किट स्टॉल, वडापाव, समोसा स्टॉल लावले होते. विद्यार्थ्यांनी आठवडी बाजाराचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी विद्यार्थ्याचा आनंद ओसंडून वाहत होता. या कार्यक्रमास विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी पोलिस पाटील, ग्रा.पं. सदस्य, शा.व्यवस्थापन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत नंदेश्वर, शा. व्य. समिती, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
वडापाव स्टॉल ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
नंदेश्वर गावच्या ग्रामस्थांना चिमुकल्यांचा आठवडी बाजार भरणे हे मोठे आकर्षण ठरले. त्यातही या आठवडी बाजारात श्रीकांत सासणे आणि शौर्य सासणे यांनी लावलेला वडापाव आणि समोसा स्टॉल या आठवडा बाजारातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. गावातील अनेक लहान मुले, युवक यांचेसह महिलावर्ग आणि वृद्धांनीही सासणे बंधूंच्या वडापाव स्टॉलवर वडापाव खरेदी केला.