मंगळवेढा(प्रतिनिधी) जमिनीतील गुप्त धन काढून देतो,करणीबाधा घालवतो,घरात भांडणे होवू देत नाही असा बहाणा करून घरात धुप अंगारे जाळून 13 लाख 44 हजार 900 रुपये रोख व फोन पे च्या माध्यमातून घेवून फसवणूक केल्याप्रकरणी महाराज तथा भगवान उर्फ सुदर्शन जगन्नाथ स्वामी,मुलगा विरभद्र उर्फ उदय भगवान उर्फ सुदर्शन स्वामी रा.मालवंडी ता.बार्शी या पिता पुत्रांना पोलिसांनी अटक करून मंगळवेढयाच्या न्यायाधीश एस.एन.गंगवाल-शहा यांचेसमोर उभे केले असता पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या घटनेची हकिकत अशी,यातील फिर्यादी मायाक्का रेवणसिध्द मोटे(रा.नंदेश्वर) यांना वरील दोघा पिता पुत्र आरोपींनी जुलै 2022 ते आजतागायत या कालावधीत फिर्यादीचे मयत पती रेवणसिध्द तसेच गावातील मल्हारी करे,चेतन वाघमोडे,तानाजी सरग,सुशिलकुमार गवळी(रा.जयभवानी नगर,मंगळवेढा)आदींना करणीबाधा घालवतो,घरात भांडणे होवू देत नाही,घरातील व जमिनीतील गुप्त धन काढून देतो असे भासवून होमहवन करून फिर्यादीचे पती रेवणसिध्द यांना काठीने पायावर,पाठीवर जबर मारहाण करून डाव्या पायाचे हाड मोडून घरातील लोकांना पांढरी पावडर पाजून सर्वांकडून 13 लाख 44 हजार 900 रुपये रोख व फोन पेच्या माध्यमातून घेवून वरील लोकांची फसवणूक केल्याची फिर्याद दाखल होती.तपासिक अंमलदार पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी पोलिसांच्या मदतीने मालवंडी ता.बार्शी येथे जावून पिता पुत्रांना तात्काळ अटक करून मंगळवेढा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दि.19 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यात आरोपीतर्फे अॅड.धनंजय हजारे,अॅड.सीमा ढावरे,अॅड.सुषमा माने यांनी तर सरकारपक्षाकडून अॅड.धनंजय बनसोडे यांनी काम पाहिले.