देशात द्वेष पसरवण्याचे काम भाजपा , आरएसएस कडून केले जात आहे. जाती-धर्मांमध्ये भांडणे लावली जात आहेत. आपल्याच देशातील जाती- धर्मांच्या लोकांमध्ये भांडणे लावणारे भाजपावाले कोणत्या देशाचे राष्ट्रभक्त ?असा सवाल विचारात हे लोक आपल्या देशाचे तर राष्ट्रभक्त असू शकत नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी आज भारत जोडो यात्रेदरम्यान केली. यावेळी राहुल गांधी यांनी नोटाबंदीवरही टीका केली. नरेंद्र मोदी यांनी आजच्याच दिवशी 6 वर्षांपूर्वी रात्री 8 वाजता टीव्ही वर येऊन हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद केला. तर जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू करून देशातील लहान, छोट्या उद्योगांवर मोठा आघात केला. नरेंद्र मोदी यांच्या या दोन्ही निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था बर्बाद केली, असा घणाघाती हल्ला खा. राहुलजी गांधी यांनी केला. भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील दुस-या दिवशीची पदयात्रेची सांगता भोपाळा गाव येथील छोटेखानी सभेने झाली. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले. राहुलजी गांधी पुढे म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले छोटे, मध्यम, लघु उद्योगाचे मोठे नुकसान झाले, लाखोंच्या संख्येने उद्योग बंद पडले, लाखो रोजगार गेले. तर नोटबंदीच्या लहरी निर्णयानेही नुकसान झाले. दोन्ही निर्णयाने देशाचे मोठे नुकसान व केवळ दोन-तीन उद्योगपतींचा फायदा झाला. शेतक-यांचे कर्ज माफ होत नाही पण मोठ्या उद्योगपतींचे लाखो कोटी रुपयांचे कर्ज मात्र माफ होते. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग भांडवलदारांना विकले जात आहेत परिणामी तरुणांना नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे. यात्रे दरम्यान मृत्यू पावलेल्या काँग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांना या सभेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. खा. राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही पांडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. भारत जोडो यात्रेदरम्यान मृत्यू पावलेले काँग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांच्या कुटुंबीयांना काँग्रेस पक्षातर्फे 25 लाखांची मदत करण्यात येणार आहे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही घोषणा केली.
Check Also
Close