निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी येथे पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ समाधान आवताडे यांनी दिली.
या अगोदर आ.आवताडे यांनी हुन्नूर येथील पशुसंवर्धन दवाखान्याच्या आरोग्यविषयक व इतर भौतिक सोयी-सुविधांसाठी ५०लाख मंजूर रुपये जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर करून घेतला होता. हुन्नूर येथील पशुसंवर्धन दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या जनावरांना चांगल्या दर्जात्मक पद्धतीने उपचार व्हावेत यासाठी आ आवताडे यांनी या दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर केल्याने येथील पशुपालक व संबंधित आरोग्य विभाग यांची चांगली सोय झाली आहे. मंगळवेढा तालुक्यातील बहुतांश शेतकरी नागरिक आपल्या पारंपरिक शेती व्यावसायाला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय नेटाने करत आहेत.
निंबोणी येथे मंजूर झालेल्या या दवाखान्याच्या उभारणीमुळे या भागातील पशुपालकांची चांगली सोय होणार आहे. अवेळी पडणारा पाऊस तसेच वातावरणामध्ये वारंवार अनपेक्षित होणारे बदल यामुळे जनवारांना विविध प्रकारचे आजार तसेच निरनिराळ्या रोगांना सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे आजारी जनावरांना आवश्यक आणि योग्य उपचार करण्यासाठी पशुपालकांची धावपळ होत होती. अशा परिस्थितीमध्ये आ आवताडे यांच्या गावभेट संवाद दौऱ्यादरम्यान येथील ग्रामस्थांनी व पशुपालकांनी निंबोणी येथे पशुसंवर्धन केंद्र व्हावे यासाठी आ समाधान आवताडे यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले होते.
पशुपालकांच्या या मागणीची आ समाधान आवताडे यांनी तत्परतेने दखल घेऊन संबंधित विभागाकडे पाठपुरावा व पत्रव्यवहार करून हा निधी मंजूर करून आणल्याने निंबोणी गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आणि पशुपालकांनी आ समाधान आवताडे यांचे अभिनंदन केले.