मंगळवेढा(प्रतिनिधी) रत्नागिरी-नागपूर महामार्गावर सांगली जिल्ह्यातील आगळगाव फाटा येथे भीषण अपघातामध्ये थांबलेल्या ट्रॅक्टरला भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातामध्ये मंगळवेढा तालुक्यातील चार जण ठार तर दहाजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तिघे चिक्कलगीचे तर एकजण शिरनांदगी येथील समाविष्ट आहे. त्यामध्ये शिरनांदगी येथील शालन दत्तात्रय खांडेकर (वय -३०) जगमा तम्मा हेगडे (वय-३५), दादा आप्पा ऐवळे (वय-१७), निलाबाई परशुराम ऐवळे (वय- ३) रा सर्वजण चिक्कलगी यांचा समावेश आहे. दोन महिला एक पुरुष आणि एक लहान मुलीचा समावेश आहे.
या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर मृतांच्या नातेवाईकास ५ लाख, गंभीर जखमीस १ लाख तर किरकोळ जखमीस ५० हजार रुपये अशी शासकीय मदत जाहीर झाली असल्याची माहिती पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
राज्य शासनाच्या ऊसतोड कामगार महामंडळाकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशाने ही मदत त्वरित जाहीर झाली आहे. जखमींना आवश्यक व योग्य ते उपचार उपलब्ध होणेकामी तसेच शासकीय मदत यासाठी आमदार आवताडे यांनी राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला होता. मंत्री डॉ खाडे यांनी आमदार आवताडे यांच्या मागणीची प्राधान्याने दखल घेऊन जखमींची मिरज व कवठेमहांकाळ येथील हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेत विचारपूस करून आवश्यक उपचार यंत्रणेसाठी हॉस्पिटल प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना व जखमींना शासन पातळीवरून आर्थिक मदत मिळावी यासाठी आ आवताडे यांनी मंत्री ना. खाडे यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी या मागणीवरून राज्याच्या वरिष्ठ पातळीवरून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व संबंधित मंत्री यांच्यामार्फत ही मदत मिळवून देण्यासाठी मोठे सहकार्य केले आहे.
सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार समाधान आवताडे यांचे बंधू कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांनी तात्काळ मृतांच्या व जखमींच्या मंगळवेढा तालुक्यातील घरी जाऊन त्यांची भेट घेत धीर दिला होता.