पंढरपूरमंगळवेढासोलापूर

दामाजीवर आ आवताडेंच्या 200 कोटी कर्जाचा डोंगर अहवालातून गायब-मा.संचालक सुरेश भाकरे

मंगळवेढा(प्रतिनिधी) दामाजी कारखान्यावर 198 कोटीचे कर्ज करून डबघाईला आणलेला कारखाना वाचवण्यासाठी समविचारी आघाडीला निवडून द्या असा खोटा प्रचार करत समविचारी आघाडीने कारखाना जिंकला मात्र नुकताच प्रसिद्ध झालेल्या कारखान्याच्या अहवालात या 200 कोटी कर्जाचा कुठेही उल्लेख नसल्याने समविचारी आघाडीने केलेले आरोप हे धादांत खोटे असल्याचे त्यांनी स्वतःच सिद्ध केल्याचे माजी संचालक सुरेश भाकरे यांनी सांगितले.
दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येला माजी संचालक सुरेश भाकरे यांनी केलेला आरोप खळबळ उडवून देणारा ठरला आहे. याबाबत अधिक बोलताना सुरेश भाकरे म्हणाले की, समविचारी आघाडीने खोटेनाटे आरोप करून सत्ता पदरात पाडून घेतली असली तरी कारखान्याच्या वार्षिक अहवालामध्ये सर्व गोष्टी उघड झाल्या. आ.समाधान आवताडे यांनी कारखान्यावर 200 कोटीचे कर्ज केले असून ते यापुढे कारखाना चालवू शकणार नाहीत असा अपप्रचार केला होता, मात्र आवताडे यांनी आपल्या प्रचार सभेमध्ये कारखान्यावर फक्त 75 कोटीचे कर्ज असल्याचे सांगितले होते ते सांगताना 2016 साली कारखाना आवताडे यांच्या हात्ती येताना कारखान्यावर 145 कोटी रुपये कर्ज होते. त्यातील 70 कोटी कर्ज फेडल्याचे ते वारंवार सांगत होते. त्याचबरोबर जिल्ह्यात दोन नंबर वर रिकव्हरी ठेवली. नुसत्या साखर उत्पादनावर कारखाना सुरू असताना सहा वर्षे कारखाना व्यवस्थित चालविला, चालू संचालक मंडळाला अजून थकीत पगार देता आला नाही, दहा रुपयानेच साखर देणार असे म्हणत कारखान्याचे सभासद वाढ केली, स्वस्तात साखर मिळतेय या आशेने सभासदांनी दहा हजार रुपयांनी शेअर्स भरले यातून कारखान्याला दहा कोटी रक्कम गोळा केली व दहा रुपये किलोचे साखर वीस रुपये किलो करून दहा किलो साखरही कमी करत सभासदांचा विश्वासघात केला आहे, त्याच बरोबर सभासदांचा अपघाती विमाही बंद केला आहे यावरून चालू संचालक मंडळाचे निर्णय सभासद विरोधी असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
आमच्या संचालक मंडळाने प्रतिदिन दोन लाख लिटर क्षमता असलेल्या डिस्टलरी प्रकल्पाच्या सर्व परवानगी घेतल्या होत्या मात्र विद्यमान संचालक मंडळाला पुढे काहीच करता आले नाही. प्रचारात कामगार पतसंस्थेचं देणं दिल नाही, म्हणून सांगणा-यांनी सत्ता आल्यावर किती देणी दिली? कामगारांच्या ब्रेकचा कालावधी वाढवून काही संचालकांच्या मर्जीतील कामगारांना कामावर बोलविले व प्रामाणिक व कष्टकरी गरीब कामगारांवर उपासमारीची वेळ आणली. आमचे संचालक मंडळाच्या काळात मशिनरी मेंटेनन्स वरती सहा वर्षात १० ते १२ कोटी खर्च केला होता. या संचालक मंडळाने आवघ्या एक वर्षात १२ ते १४ कोटी खर्च केलेची चर्चा असून, या खर्चाला आडकाठी करणाऱ्या एका अधिकाऱ्याला कामावरून काढून टाकल्याचेही बोलले जात आहे. त्याच बरोबर विद्यमान संचालक मंडळाला निवडणुकीमध्ये मदत केलेल्या “सजग नागरिक संघाचे” पदाधिकारी मशिनरी पार्ट खरेदीच्या जादा बिले आकारलेले खात्री झाले नंतर बिलाची खातरजमा करण्यासाठी एक ते दोन वेळा कारखान्यावर गेले असता त्यांनाही टाळाटाळीचे उत्तरे देऊन पारदर्शी कारभाराचा नमुना दाखवलेची चर्चा आहे.
आ.आवताडेंचे काळातील संचालक मंडळाने वैयक्तिक मालमत्तेवर कर्ज काढून कारखाना व्यवस्थित चालविला सध्याच्या संचालक मंडळाच्या काळात कुणाचा कुणाला ताळमेळ असल्याचे दिसत नसून, सताधारी संचालक मंडळाने कर्ज कमी करण्या पेक्षा वाढवल्याचेच अहवालातून दिसून येत आहे. त्यामुळे आहवालात दाखवलेला नफा कितपत खरा आहे यावर प्रश्न उपस्थित होत असून सभासदांनी निवडून दिलेले कारभारी नीट कारभार करतात का? हे अहवाल वाचून सभासदांनी ठरवीत वेळच्या वेळी जाब विचारणे गरजेचे आहे.

गोरगरीब सभासदांना सुरू असलेला अपघाती विमा चालू संचालक मंडळाने बंद केला. असून तो विमा सुरू करून सभासद शेतकऱ्यांना आधार द्यावा तसेच सणासुदीला १० रुपये किलोने साखर देत गरिबांचे संसार आम्ही गोड केले मात्र या संचालक मंडळाने २० रुपये किलो दर करून ६० किलोची साखर ५० किलो केली आहे तेही पूर्ववत करावे. बाकी कोण खरे कोण खोटे हे अहवालातून स्पष्ट झाले असून कारखाना कुणी चांगला चालविला याचे मूल्यमापन आगामी काळात सभासदच करतील.
आ समाधान आवताडे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close